बौद्धिस्ट समन्वय कृती समितीच्या वतीने १८ व्या दोन दिवसीय धम्मपरिषद आणि वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
चंद्रपूर : बौद्धिस्ट समन्वय कृती समितीच्या वतीने आयोजित या धम्मपरिषदेच्या माध्यमातून समाजाला जगण्याचा नवा दृष्टिकोन मिळावा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या धम्माच्या शिकवणींचा प्रचार व प्रसार यामाध्यमातून व्हावा, हा समाज परिवर्तनाचा मार्ग आहे. धम्म म्हणजे फक्त बौद्ध धर्म नाही, तर शांती आणि मानवतेची शिकवण देणारा जीवनमार्ग असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.बौद्धिस्ट समन्वय कृती समितीच्या वतीने मुल रोड इंदिरा नगर येथे १८ व्या दोन दिवसीय धम्मपरिषद आणि वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअर सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, बौद्धिस्ट समन्वय कृती समितीचे अध्यक्ष बुद्धप्रकाश वाघमारे,हरिष सहारे,तुषार सोम, विश्वजित शाहा,राशिद हुसेन आदींनी प्रमुख उपस्थिती केली.यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आपला समाज प्रगतीच्या मार्गावर आहे,परंतु अजूनही शिक्षण,रोजगार आणि आरोग्य या मूलभूत क्षेत्रांत काम करण्याची गरज आहे. आपण मागील पाच वर्षांत या क्षेत्रात काम केले आहे. आपल्या मुलांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी,आणि प्रत्येकासाठी चांगल्या आरोग्यसेवांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षा दिलेल्या पवित्र दीक्षाभूमीच्या विकासाचा घेतलेला संकल्प पूर्ण करता आल्याचा आनंद आहे. ५७ कोटी रुपयांच्या निधीतून येथे सुंदर जागतिक दर्जाचे काम केले जाणार आहे. शहरातील १७ बुद्धविहारांमध्ये आपण अभ्यासिका तयार करणार आहोत. यासाठीही जवळपास पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे ते यावेळी म्हणाले.वधू-वर परिचय मेळावा हा केवळ एका परंपरेचा भाग नाही,तर नव्या नात्यांच्या उभारणीसाठी एक उत्तम माध्यम आहे.अशा कार्यक्रमांमुळे केवळ नाती जुळत नाहीत, तर समाजात एकोप्याची भावना निर्माण होते. आयोजकांनी या कार्यक्रमाद्वारे आपल्या तरुण पिढीला योग्य जीवनसाथी निवडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यातून पुढील पिढ्यांसाठी एक आदर्श निर्माण होणार, असे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.